*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**कोकणच्या लाल मातीत , मनात कोरला जाणारा ‘दशावतार’* *संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*पुणे*
एखादी कलाकृती किंवा एखादा चित्रपट खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात तेव्हा घर करतो ,जेव्हा सर्वसामान्य लोक आपल्या पद्धतीने त्याचा गौरव करतात, त्याची चर्चा करतात आणि त्या कलाकृतीशी एक आत्मीय नातं जोडतात. झी स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुचर्चित चित्रपटाबाबत असाच अनुभव सध्या येत आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ येथील काही निसर्गप्रेमी रसिक प्रेक्षकांनी आपल्या मनातील उत्साहाला आकार देत कुडाळच्या लाल मातीवर तब्बल चाळीस फुटी ‘दशावतार’ ही अक्षरे रेखाटली. या अनोख्या उपक्रमातून प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेली आगळी-वेगळी मानवंदना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. यातून चित्रपटाबद्दलचा उत्साह आणि आत्मीयता किती खोलवर रुजली आहे याची प्रचिती येत आहे.
कुडाळच्या निसर्गरम्य वातावरणात स्थानिकांनी ‘दशावतार’ कोरून आपला चित्रपटाबद्दलचा उत्साह व्यक्त केला. या उपक्रमाविषयीच्या भावना सांगताना त्यांनी म्हटले, ''या चित्रपटाची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत. त्यामुळेच ही आगळीवेगळी कल्पना आमच्या मनात आली. निसर्गाच्या जवळ नेणारा हा चित्रपट असल्याने त्याला निसर्गाच्या मातीतूनच मानवंदना द्यावी,असे आम्हाला वाटले आणि त्यातूनच या उपक्रमाला आकार मिळाला.''
महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात, गणेशोत्सवासोबतच दशावतार ही कलापरंपरा दिमाखात साजरी केली जाते. या सांस्कृतिक परंपरेला मोठा सलाम करत ‘दशावतार’ हा भव्य मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची भक्कम फौज लाभली आहे. तसेच या चित्रपटात विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती सुबोध खानोलकर यांनी केले आहे. गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केले आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. तसेच सुजय हांडे, ओंकार हांडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे व अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. येत्या १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.