*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज* *३७व्या पुणे फेस्टिव्हलचे २९ ऑगस्ट रोजी**राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन!*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
                                                     

*३७व्या पुणे फेस्टिव्हलचे २९ ऑगस्ट रोजी*
*राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन!*
*पुणे* 
कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा आणि पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा गौरवशाली ३७वे वर्ष साजरे करीत आहे.  यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ‘पुणे फेस्टिव्हल’ संपन्न होईल. याचे उद्घाटन शुक्रवार,  दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री मा. गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मा. शंभूराज देसाई आणि महाराष्ट्राच्या महसूल राज्यमंत्री मा. माधुरी मिसाळ हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यासोबतच खा. सुप्रिया सुळे, खा. मेधा कुलकर्णी, खा. श्रीरंग बारणे, खा. सुनेत्रा पवार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पुणे मनपा आयुक्त श्री. नवलकिशोर राम, महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका सौ. शमा पवार हे याप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील. तसेच अनेक परदेशी पाहुणे व परदेशी विद्यार्थीदेखील उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, Abdul Inamadar, Trustee - Azam Campus यावेळी उपस्थित होते.

भव्य उद्घाटन सोहळा, अशोक हांडे प्रस्तुत 'आवारा  हूँ’ कार्यक्रम, ऑल इंडिया मुशायरा, मनीषा साठे प्रस्तुत ‘डिव्हाइन कॉन्फ्लुएन्स’ (जपानी नृत्याविष्कार), केरळ महोत्सव, जुळ्यांचे संमेलन, संगीत सौभद्र, नारदीय कीर्तन महोत्सव, मराठी कविसंमेलन, हिंदी हास्यकविसंमेलन, इंद्रधनु, उगवते तारे, ‘मिसेस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा, व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल, महिला नृत्य स्पर्धा, मेकअप स्पर्धा, लावणी, मराठी-हिंदी गीते, पर्यटनविषयक परिसंवाद, पुण्यातील प्रेस फोटोग्राफर्सचे छायचित्र प्रदर्शन, महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन, वारली पेंटिंग्ज प्रदर्शन, युनेस्कोने नामांकित केलेल्या १२ किल्ल्यांचे पेंटिंग्ज प्रदर्शन व स्पर्धा,  पेंटिंग्ज स्पर्धा व प्रदर्शन याबरोबरच गोल्फ कप टुर्नामेंट, बॉक्सिंग, द डर्ट ट्रॅक, मल्लखांब, कॅरम, बुद्धिबळ, शरीरसौष्ठव व  स्केटिंग अशा क्रीडा स्पर्धाही यंदाच्या पुणे फेस्टिव्हलची वैशिष्ट्ये आहेत.
ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, संगीतकार मदनमोहन, ओ.पी. नय्यर व सलिल चौधरी आणि नाट्य संगीत गायिका व अभिनेत्री जयमाला शिलेदार या सहा कलावंतांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांवर आधारित विशेष कार्यक्रम मनाला हळवा करेल.
पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, महाराष्ट्र साहित्य परिषद, सावरकर स्मारक भवन आणि विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धा संपन्न होतील. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत..‌
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. त्यावेळी त्यामध्ये कथाकथन, कीर्तन, पोवाडे, लोककला, मेळे असे कार्यक्रम होत असत. यापासूनच प्रेरणा घेऊन १९८९मध्ये महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी ‘पुणे फेस्टिव्हल’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात केली. सलग १० दिवस आणि ३७ वर्षे सुरू असलेला पुणे फेस्टिव्हल देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. यापासून प्रेरणा घेऊन अनेक सांस्कृतिक महोत्सव सुरू झाले. त्यामुळे पुणे फेस्टिव्हलला ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल्स’ म्हटले जाते. भारतरत्न पं. भीमसेन जोशी प्रथमपासून पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना पद्मश्री खा. हेमामालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन आहेत. 
पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते.
३७व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवलकिशोर राम सपत्नीक करतील. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी हे याप्रसंगी पौरोहित्य करतील.
३७व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील व सुमा शिल्प हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, एनईसीसी, आयआयएफएल कॅपिटल, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, सुहाना मसाले आणि  अहुरा बिल्डर्स  हे उपप्रायोजक आहेत.
विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंतांना पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘जीवनगौरव’ पुरस्कार, तसेच ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन गौरविले जाते. यंदा भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. ए. इनामदार  यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविले जाईल. तसेच ज्येष्ठ नाट्यलेखक डॉ. सतीश आळेकर, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज मोहोळ, माउली कृषी पर्यटन केंद्राचे ज्ञानदेव कामठे आणि उद्योजिका सुप्रिया बडवे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन सन्मानाने गौरविले जाईल.
सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील मंडळाचा पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे  कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'जय गणेश पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. यंदा रास्ता पेठेतील नायडू गणपती मंडळ यांना या पुरस्काराने गौरविले जाईल.
उद्घाटन सोहळा
दरवर्षीप्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळादेखील नेत्रदीपक असेल. सुरुवातीला ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर व त्यांचे  सहकारी यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. दीपप्रज्वलन व श्री गणेश आरती होईल. नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांच्या कलावर्धिनी नृत्यशाळेतर्फे भरतनाट्यम् गणेशवंदना सादर होईल. नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. जानकी ग्रुप ऑफ गरबा अँड फोक संस्थेतर्फे ‘शिवतपस्वींचे नृत्य’ सादर होईल. भैरवी सचदेव यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सिम्बायोसिस संस्थेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार याचे आयोजन रूपाली चौधरी यांनी केले आहे. महाराष्ट्र मंडळाच्या युवा कसरतपटूंनी सादर केलेली मल्लखांब प्रात्यक्षिके हे वेगळे आकर्षण असेल. सिक्कीम भारतात विलीन झाला, त्यास यंदा ५० वर्षे झाल्यानिमित्त  ऋतुरंग कल्चरल ग्रुप यांनी आयोजिलेले  सिक्कीमचे ‘मरोनी’ लोकनृत्य व आसामचे ‘बिहू’ नृत्य सादर होईल. करुणा पाटील व देविका बोरठाकुर यांनी याचे आयोजन केले आहे. पुण्यातील ईश्वरपुरम संस्थेत शिकणाऱ्या नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा ‘वॉर डान्स ऑफ नागालँड’ आणि ‘फेस्टिव्हल डान्स ऑफ अरुणाचल’ हे नृत्याविष्कार सादर होतील. विनीत कुबेर यांनी याचे आयोजन केले आहे. ‘पुणे मल्याळी फेडरेशन’तर्फे पुण्यातील केरळी कलावंतांचा राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा ‘मिले सूर मेरा-तुम्हारा’ हा नृत्याविष्कार सादर होईल. याचे आयोजन फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर यांनी केले आहे. आदिवासी संचालनालयाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे ‘तारपा’ हे आदिवासी लोकनृत्य सादर होईल. पुष्पलता मडावी यांनी याचे आयोजन केले आहे. कथ्थक व लावणी  यांची जुगलबंदी पायालवृंद डान्स अॅकॅडमीतर्फे सादर होईल. याचे नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले आहे. ही सारी उद्घाटन सोहळ्याची सांस्कृतिक वैशिष्ट्ये असतील.

या उद्घाटन सोहळ्याचे मराठीतून योगेश देशपांडे व इंग्रजीतून सरिता मूलचंदानी  हे सूत्रसंचालन करतील.
श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथील कार्यक्रम
ऑल इंडिया मुशायरा : राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सलोखा जोपासणारा ‘ऑल इंडिया मुशायरा’ कार्यक्रम शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे रात्री ८.०० वाजता सादर होईल. याचे उद्घाटन खा. फौजिया खान करतील. यामध्ये गोविंद गुलशन (गाझियाबाद),  इरशाद अंजुम  (मालेगाव), आरिफ सैफी  (हैदराबाद), निखत अमरोही (अमरोह), सज्जाद झंझट (रुरकी), मेहेक कैरांवी (हैदराबाद),  जुबैर अली ताबीश (जळगाव),  डॉ. इफ्तेखार शकील (रायचूर), अब्बास कमर (दिल्ली), कलीम जावेद (किरातपूर), हिसामुद्दीन शोला  (पुणे) हे देशातील नामवंत शायर सहभागी होत आहेत. शायरांच्या कार्यक्रमाचे अंजुम शायर हे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. ए. इनामदार असून, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आबेदा इनामदार या निमंत्रक आहेत. यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘ऑल इंडिया मुशायरा’चे २६वे वर्ष आहे.
आवारा हूँ : रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कलावंत व निर्माते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, गायक व संगीतकार अशोक हांडे निर्मित ‘आवारा हूँ’ हा गायन, नृत्य व संगीताचा भव्य प्रयोग सादर होईल. यामध्ये राज कपूर यांच्या चित्रपट योगदानावर निवेदन, गाणी, नृत्य आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्रयोग सादर होईल. यासाठी एलईडी स्क्रीनवर राज कपूर यांच्या निवड चित्रपटांतील प्रसंग व गाणी दाखविली जातील. यामध्ये १२५ कलावंत असणार आहेत. राज कपूर यांच्या कलाकृतींच्या भव्यतेप्रमाणेच या कार्यक्रमातही मोठी भव्यता असणार आहे.
डिव्हाइन कॉन्फ्लुएन्स (जपानी नृत्याविष्कार) : सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे  मनीषा नृत्यालय प्रस्तुत ‘डिव्हाइन कॉन्फ्लुएन्स’ हा ओरिएंटल कला यांचा भव्य संगम घडविणारा विशेष कार्यक्रम सादर होईल. नृत्य आणि जपानी तायको ड्रम्स वादन, पारंपरिक संगीत, जागतिक संगीत, कथ्थक नृत्य याबरोबरच कोरियन फॅन डान्स, हेव्हन लेडी, चायनीज स्टीक डान्स यांसारखे कलाप्रकार रसिकांना बघायला मिळतील. याची संकल्पना आणि दिग्दर्शन गुरू पं. मनीषा साठे आणि श्री. यासुहितो ताकिमोतो यांनी केले आहे.

 


Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*